नाशिकमधील क्रिडेची ओळख: यशवंत व्यायाम शाळा.



आपल्या नाशिक शहराला सर्व क्षेत्रांचा वारसा लाभलेला आहे. मग तो सांस्कृतिक असो, कला असो किवा क्रीडा असो. सर्वच क्षेत्रातले अनेक दिग्गज आपल्या नाशिक मध्ये होऊन गेलेले आहेत. अनेक लोक आणि संस्था या सर्वाचे साक्षीदार आहेत. या सर्व साक्षीदारांपैकी एक म्हणजे गेल्या एक शतकापासून जास्त काळ ताठ मानेने महात्मा गांधी रोडवर उभे असलेले ‘ यशवंत व्यायाम शाळा ‘. नाशिकमधील क्रिडेचा वारसा आणि क्रीडाक्षेत्रातील नाशिकचे योगदान याचे गेल्या १०५ वर्षांपासून यशवंत व्यायाम शाळा हे साक्षीदार आहेत.
यशवंत व्यायाम शाळा हे नाशिक मधील एक नावाजलेले क्रीडा विद्यापीठ आहे. ‘ राष्ट्रास रक्षण्याला व्यायाम मंत्र घ्यावा ‘ हे ब्रीदवाक्य घेऊन १ मार्च १९१७ रोजी कै. गुरुवर्य कृष्णाजी बळवंत महाबळ, कै. त्रिंबकराज मामा देशपांडे, कै. रंगनाथ कृष्ण यार्दी या त्रिमुर्तींनी ही व्यायाम शाळा स्थापन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी युवाशक्ती एकत्र करण्याकरिता शहरातील इतर व्यायामशाळा व तालीम संघ स्थापन झाले, त्याच उद्देशाने यशवंत व्यायाम शाळा ही गोदेच्या काठी स्थापित करण्यात आली. व्यायमाबरोबरच राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी व्यायामशाळा एक केंद्र बनले. सुरुवातीला यशवंत महाराज पटांगणाच्या परिसरात ही व्यायामशाळा सुरू झाल्याने या व्यायामशाळेला ‘ यशवंत ‘ हे नाव देण्यात आले. सुरुवातीच्या काळात या व्यायामशाळेत योगासने, मल्लखांब, कवायती, दंडबैठका, लाठीकाठी व आत्मसंरक्षणाचे प्रकार शिकवले जात. १९२८-२९ मध्ये ३०० ते ४०० तरुणांनी यशवंत महाराज पटांगणावर एकाचवेळी साखळी पद्धतीने एक लाख सूर्य नमस्कार घालण्याचा विक्रम केल्याने या व्यायामशाळेचे कीर्ती संपूर्ण देशभरात पसरली.
संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असतानाच १९३९ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरमध्ये संपूर्ण यशवंत व्यायामशाळा वाहून गेली. त्यानंतर मुंबई प्रांताचे प्रमुख असलेले बाळासाहेब खेर यांच्या सहकार्याने यशवंत व्यायामशाळेस महात्मा गांधी रोडवर (सध्या आहे तिथे) ३० वर्षांच्या कराराने दोन एकर परिसर असलेला भूखंड प्रतिवर्ष एक रुपया भाडे तत्त्वावर १९४८ मध्ये देण्यात आला. ही जागा ताब्यात घेताना संस्थेची नोंदणी आवश्यक असल्याने संस्थेची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज मुंबई यांच्याकडे १० ऑगस्ट १९४९ रोजी रीतसर नोंदणी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. डी.बी. खाडिलकर हे होते.
संस्थेला जागा ताब्यात मिळाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे व्यायामशाळेची इमारत बांधण्याचा व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा. परंतु संस्थेचे संस्थापक त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळी यांनी वैयक्तिक देणगी तर दिलीच, त्याशिवाय हाती घेतलेल्या कामात अडथळा येऊ नये यासाठी बांधकामासाठी कर्ज काढले.बांधकाम सुरू असतानाच एकीकडे तरुणांना मोकळ्या मैदानावर योगासन, मल्लखांब,कवायती, कुस्ती यांचे शिक्षण देण्यास सुरुवात केली, तर तरुणांमध्ये सांघिक भावना जोपासण्यासाठी खो खो, आट्यापाट्या या सांघिक खेळाचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. १९५२ मध्ये तत्कालीन महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते यशवंत व्यायामशाळेच्या पहिल्या इमारतीचे उद्घाटन करून त्यावेळच्या परिस्थितीनुसार नाशिककरांसाठी भव्य असे व्यायामाचे दालन त्याचबरोबर मैदानी खेळांसाठी क्रीडांगण उपलब्ध झाले.
संस्थेच्या स्थापनेपासून अध्यक्षपदाची धुरा अप्पासाहेब खाडिलकर, देवकिसनजी सारडा, कै. का.पु.वैशंपायन, कै. डॉ. वि.म.गोगटे, अॅड. गो.अ.लेले, लक्ष्मणराव वाघचौरे, प्रा.डॉ. बी.डी. चौरे यांनी सांभाळली आहे. सद्यस्थितीत ही धुरा दीपक पाटील हे सांभाळत आहेत. दिपक पाटील हे स्वतः मल्लखांबचे उत्कृष्ठ खेळाडू. मल्लखांब मध्ये त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. संस्थेचे शिक्षक कै. श्रीधरपंत कुलकर्णी, कै. च.ल. खरपास, श्री. शंकरराव खळगे, श्री. आबासाहेब घाडगे यांनी संस्थेमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त काळ विनामूल्य आपले योगदान दिले. यापैकी कै. श्री.श्रीधरपंत कुलकर्णी, कै. च.ल. खरपास, श्री. शं. गो. खेळगी, श्री. आबासाहेब घाडगे हे आजही व्यायामशाळेत कार्यरत आहेत.
संस्थेच्या आधीच्या काळात तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री. बाळासाहेब खेर, महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे, भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, त्याचबरोबर त्यावेळचे जिल्हाधिकारी आणि आशिया खंडातील बॉडी बिल्डिंग व वेटलिफ्टींग मधील भीष्माचार्य मधुकरराव तळवळकर व मि. युनिव्हर्स श्री. प्रेमचंद डिंग्रा यांनी भेट देवून संस्थेच्या कामकाजाची पाहणी करून प्रशंसा केली.
संस्थेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर संस्थेचे व त्यासोबतच आपल्या भारत देशाचे नाव उज्वल करत आहेत. आपल्या अभिमानास्पद कामगिरीतून यशवंत व्यायाम शाळेची कीर्ती ते दूरपर्यंत नेत आहेत. कै. दादासाहेब वाघचौरे, कै. पंडितराव बोरस्ते, श्री. आनंद खरे, श्री. अविनाश खैरनार, शामा सारंग, सुषमा प्रधान या सर्व खेळाडूंना छत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
मोजक्या खेळांपासून सुरू झालेल्या या व्यायामशाळेत आज असंख्य खेळ खेळले जातात जसे की वेटलिफ्टिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, बास्केटबॉल, हॉलीबॉल, ज्युडो, टेबलटेनिस, बॅडमिंटन. या व्यायामशाळेत फक्त खेळच नाही तर मुलींना शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महिला जिम देखील सुरू करण्यात आली आहे. सर्व खेळांच्या कोच ने त्या त्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे व राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पदक मिळविलेले आहेत.
नाशिक मध्ये सोलर सिस्टिम असणारी एकमेव व्यायाम शाळा म्हणजे यशवंत. ‘ नाशिक रन ‘ ही संस्था व त्यांचे पदाधिकारी यांनी व्यायामशाळेस नऊ लाख रुपये खर्च करून सोलर सिस्टिम बसवून दिली.
खेळाव्यतिरिक्त संस्थेने सर्व लोकांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी २५० फुटाचा जॉगिंग ट्रॅक तैयार केलेला आहे. या जॉगिंग ट्रॅकचा उपयोग नाशिकचे अनेक नागरिक विनामूल्य करत आहेत.
यशवंत व्यायाम शाळेचा १०५ वर्षांचा क्रिडेचा वारसा असंख्य अडथळे पार करत इथपर्यंत पोहोचला आहे. कोणताही प्रवास हा अडचणींशिवाय पूर्ण होत नाही; अडचणी येणे विशेष नाही तर त्या अडचणींवर मात करून प्रवास न थांबता सुरू ठेवणे हे विशेष आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे यशवंत व्यायाम शाळा. अनेक अडचणींना पार करत यशवंत व्यायाम शाळेने क्रीडा क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे व अजूनही घेत आहेत. उत्तुंग भरारी घेण्याची स्वप्नं उराशी घेऊन येणाऱ्या खेळाडूंच्या पंखांना बळ देण्याचे अविरत कार्य यशवंत व्यायाम शाळा करत आहे व करत राहील.

Leave a Comment