‘रामनगरी’ ते ‘द्राक्षांच शहर’ पर्यंत आपली ओळख जपणारे शहर म्हणजे नाशिक. गेल्या दीड शतकात नवनवीन आव्हान पार करत स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या या पवित्र भूमीने अनेक प्रगतीची पर्वते सर केली, अजुनही करत आहे. या प्रगतीमध्ये अनेक लोकांचा हातभार आहे. जसे की येथील तज्ज्ञ, येथे होऊन गेलेले मोठमोठे कवी – लेखक सामान्य नागरिक व अनेक शतकांपासुन येथे व्यापार करत असलेले व्यापारी. नाशिक येथील काही व्यापाऱ्यांनी तर त्यांच्या दुकानाद्वारे अनेक वर्ष नाशिककरांच्या मनात स्वतःबद्दल वेगळा असा ठसा उमटवलेला आहे, असेच एक दुकान म्हणजे चिनुभाई पानाचंद अँड सन्स.
मेनरोड म्हणजे नाशिकमधल्या व्यापाऱ्यांचा कणा, त्याच्याच आधारावर नाशिकमधील कित्येक दुकाने उभी आहेत. याच नाशकातील मेनरोडवर गेल्या ८२ वर्षांपासून चिनुभाई पानाचंद ॲण्ड सन्स’ हे दुकान स्थित आहे. ‘चिनुभाई पानाचंद अँड सन्स’ कापड व्यवसायातील अग्रगण्य व्यापारी आहेत. कापड व्यवसायात उत्तुंग अशी भरारी घेतलेल्या या दुकानाची स्थापना १९४० मध्ये ‘हिराचंद पानाचंद’ यांनी केली. त्यावेळी या दुकानाचे नाव ‘हिराचंद पानाचंद’ असे ठेवण्यात आले होते. परंतु कालांतराने ते बदलून ‘चिनुभाई पानाचंद अँड सन्स’ असे करण्यात आले. आता हे दुकान हिरानंद यांची तिसरी पिढी नरेंद्र चिनुभाई शाह आणि त्यांची पत्नी सौ.सुजाता नरेंद्र शाह हे चालवत आहेत.
हिराचंद पानाचंद शाह हे मुळ सिन्नर तालुक्यातील शमशेरपुरचे होते. साधारण १९३१-३२ साली ते नाशिकमध्ये आले व व्यवसायाच्या दृष्टीने एक छोटिशी इमारत विकत घेतली. याच इमारतीमध्ये त्यांनी त्यांच्या कापड व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे एकमेव असे दुकान होते जिथे होलसेल दरात धोतरजोड्या, मांजरपाट मिळायचे. त्यांचे दुकान जरी एकाच ठिकाणी होते. तरी त्यांच्या व्यवसायाची छाप अनेक गावांमध्ये होती. सटाणा, देवळा, सिन्नर, दिंडोरी, वणी, अमोगा आणि अश्याच अनेक गावांमध्ये पानाचंद या दुकानाचे कापड विकले जाऊ लागले.
हिराचंद पानाचंद शाह यांच्या नंतर हा व्यवसाय त्यांचे पुत्र चिनुभाई हिराचंद शाह यांनी हाती घेतला. वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय चिनुभाई शहा यांनी तितक्याच चिकाटीने पुढे घेऊन जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. चिनुभाई यांचे पुत्र नरेंद्र शाह (जे सध्याच्या काळात व्यवसायाचं भार सांभाळत आहे.) यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडीलांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसायचे धडे गिरविले. १६६९ पासून वडीलांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र शाह हे या व्यवसायात आले व त्यांच्या आजोबांचा आणि वडीलांचा व्यवसाय पुढे चालवला. कापड व्यवसायातील उणे-दुणे त्यांनी जाणुन घेतले आणि सर्व कारभार आपल्या हाती घेतला. या प्रवासात त्यांना त्यांची पत्नी सौ. सुजाता शाह यांची बहुमूल्य साथ लाभली. सुजाता शाह यांना व्यवसायाचे बाळकडू त्यांच्या माहेरीच मिळाले होते. त्यांच्या माहेरी त्या सराफाचे दुकान चालवत होत्या, त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी नरेंद्र शाह यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय उज्वल केला आणि आजही करत आहेत. म्हणुनच नरेंद्र शाह हे आपल्या व्यवसायात पत्नीचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगतात. १९८८ मध्ये या दुकानाची दुसरी पिढी म्हणजे चिनुभाई पानाचंद यांचे निधन झाले. नरेंद्र शाह आणि सुजाता शाह यांनी त्यानंतर खुप कष्टाने हा व्यवसाय
पुढे नेला आणि आजही नेत आहेत. जुने झाड जसे अनेक ऊन – पावसाळे बघते तसेच या दुकानाने अनेक सुख – दुःखाचे क्षण बघितले आहे. अढळपणे न थांबता चालत राहणाऱ्या या व्यवसायाला १९९५ नंतर काहीशी उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली होती. याचे कारण असे की या व्यवसायातील महत्त्वाचे उत्पादन म्हणजेच धोतर याचा वापर कमी होत चालला होता. याचा परिणाम म्हणून धोतरचे खरेदीदार ही कमी झाले होते. अश्या वेळेस सुजाता शाह यांना टॉवेलच्या व्यवसायाची कल्पना सुचली. हिंदू धर्मातील अनेक प्रसंगाना टॉवेल लागतोच ! या युक्तीने टॉवेलचाही व्यवसाय नरेंद्र शाह यांनी सुरू केला आणि त्यानंतर व्यवसायाची गाड़ी पुन्हा मार्गी लागली. त्याच्या जोडीने मांजरपाट, रुमाल यासारख्या कापडांचा व्यवसाय सुरूच होता. धोतराचा व्यवसाय कमी झाला म्हणुन टॉवेलचा व्यवसाय नरेंद्र शाह यांनी सुरू केला. पण तरीही धोतराचा व्यवसाय पुर्णपणे बंद पडला नाही. अजुनही या दुकानात धोतर उपलब्ध आहेत.
त्र्यंबकेश्वर हे असे तीर्थस्थान आहे की जेथे लाखो भाविक भेट देत असतात. गोदावरीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण जिथे असंख्य प्रकारच्या पुजा – अर्चा होत असतात. त्या पुजा – अर्चांसाठी लागणारे धोतर हे पानाचंद यांच्या दुकानातून पुरवले जाते. हा व्यवसाय करणारी आताची पिढी म्हणजे नरेंद्र आणि त्यांच्या पत्नी सुजाता यांनी कोविडच्या काळातही अनेक लोकांना मदत केली आहे. ‘ केवळ पैसा कमवायचा नाही तर नाते टिकवायचे ‘ या सिद्धांतावर हे दुकान मागची ८२ वर्षे अविरत सुरू आहे.